गाडी भारी आहे... पण ती जातेय कुठे?
गाडी भारी आहे... पण ती जातेय कुठे?
समजा तुम्हाला पुण्याहून गोव्याला जायचं आहे.
बस स्टँडवर पोहोचलात. समोर दोन बसेस आहेत. एक साधीशी बस आहे. फार काही भारी नाही. पण ती गोव्याला जातेय.
आणि शेजारी एक चकचकीत Luxury Volvo उभी आहे. मस्त आरामदायी सीट्स... AC... भारी interiors... नावाजलेली Travel कंपनी... फक्त एकच Problem आहे.
ती जातेय नागपूरला!
तुम्ही कोणती बस निवडाल?
काय मूर्खासारखा प्रश्न आहे असं वाटलं ना?
कारण आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरल्यावरच आपण तिथे नेणारी शक्य तितकी चांगली गाडी शोधतो.
गाडी कितीही भारी असली तरी ती आपल्याला हव्या असलेल्या दिशेने जात नसेल तर तिचा उपयोग काय?
पण गंमत अशी आहे की Engineering Admission च्या वेळी अनेक हुशार विद्यार्थी आणि त्यांचे सुशिक्षित पालक नेमकं याच्या उलट वागताना दिसतात.
सुरुवातीला मुलगा म्हणतो,
"मला Computer Science करायचंय."
मग Admission Process सुरू होते.
CET/JEE Rank...
Cut-offs...
College Rankings...
कॉलेज Brand...
आणि लक्षात येतं की CSE आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये मिळत नाहीये.
पण त्याच्यापेक्षा जास्त नावाजलेल्या कॉलेजमध्ये सिविल इलेक्ट्रॉनिक्स किंवा Mechanical मिळतंय.
आणि मग चर्चा सुरू होते...
"अरे पण हे College खूप चांगलं आणि मोठं आहे."
"एकदा चांगल्या कॉलेजमध्ये गेलास की Branch एवढी Matter करत नाही."
"आत्ता मिळतेय ती Branch घे. Second Year ला बदलता येईल."
आणि हळूहळू...
गाडीच्या प्रेमात आपण आपली दिशा बदलतो.
इथे माझा आक्षेप आहे.
चांगलं College महत्त्वाचं नाही का?
नक्कीच आहे.
उत्तम College तुम्हाला चांगले Professors, Labs, Peer Group, Industry Exposure, Internships, Alumni Network, Entrepreneurship च्या संधी आणि एकूणच चांगलं वातावरण देऊ शकतं. मोठ्या संस्थेचं नाव तुमच्यासाठी काही दरवाजेही उघडू शकतं.
हे सगळं मान्य.
पण म्हणून Electronics मध्ये खरोखर रस असलेल्या मुलाने केवळ कॉलेजचं नाव मोठं आहे म्हणून Civil Engineering घ्यावं?
मला तरी हे पटत नाही.
कारण College तुमच्या आयुष्यात चार वर्षं असणार आहे.
पण त्या चार वर्षांत तुम्ही कशाचा अभ्यास करता, कोणते Problems सोडवायला शिकता, कोणती Skills आत्मसात करता आणि हळूहळू कोणत्या प्रकारचे Professional बनता, याचा प्रभाव पुढची अनेक वर्षं राहणार असतो
आणि त्यात अजून एक धोकादायक गृहीतक असतं.
"आत्ता ही Branch घेतो. पुढच्या वर्षी बदलून घेईन."
कृपया चार वर्षांचा निर्णय या एका आशेवर घेऊ नका.
Branch बदलण्यासाठी पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षाला जागा खूप कमी असू शकतात. स्पर्धा प्रचंड असते. नियम वेगवेगळे असतात. काही मोठ्या संस्थांनी तर Branch बदलण्याची सुविधा बंदही केली आहे.
म्हणून एक साधा नियम —
आज जी Branch घेत आहात, त्याच Branch मधून चार वर्षांनी डिग्री घ्यावी लागली तरी चालेल का?
उत्तर 'नाही' असेल तर Admission घेण्याआधी पुन्हा विचार करा.
आता याची दुसरी बाजूही आहे.
समजा एका विद्यार्थ्याला IIT मध्ये Chemical Engineering मिळतंय आणि एका अगदी सामान्य कॉलेजमध्ये Computer Science.
मग काय करायचे ?
इथे मी सरळ,
"Branch महत्त्वाची. CSE घे." असंही म्हणणार नाही.
मी आधी त्या विद्यार्थ्याला विचारेन,
"तुला Computer Science का हवंय?"
तू Coding केलं आहेस?
त्यात तुला खरंच मजा येते?
Logical आणि Computational Problems सोडवायला आवडतात?
काही स्वतः Build केलं आहेस?
की...
"CSE ला सध्या भारी Packages चांगल्या नोकऱ्या आहेत" म्हणून CSE आवडायला लागलंय?
कारण त्याला Career Clarity म्हणता येणार नाही. तो Market चा प्रभाव आहे.
आणि Chemical Engineering खरंच आवडत नाहीये कि त्याबद्दल फारसं माहीतच नाहीये?
१७ वर्षांच्या मुलाला पुढे दहा वर्षांनी २७व्या वर्षी नेमकं कोणतं काम करायचं आहे हे माहिती असायलाच हवं, अशी माझी अपेक्षा अजिबात नाही.
पण किमान काही दिशा तरी स्पष्ट असावी.
"मला Machines आवडतात."
"Electronics मला Fascinate करतं."
"Coding करताना वेळ कसा जातो कळत नाही."
"मला वस्तू Design करायला, बनवायला आवडतात."
"Buildings, Structures कसे उभे राहतात याचं मला कुतूहल आहे."
एवढी clarity सुद्धा खूप उपयोगाची आहे.
आणि आता येतो शिक्षण नावाच्या व्यवसायाचा मुद्दा
आज उच्च शिक्षण ही एक मोठी व्यावसायिक संधी किंवा सरळ बाजार म्हणूया ... आहे ... हे वास्तव स्वीकारायला हवं.
Colleges ना Admissions हव्या आहेत.
त्यामुळे आपल्याला मोठमोठे दावे दिसतात...
"100% Placement Assistance"
"Industry Ready Curriculum"
"AI Enabled Program"
"International Collaboration"
"Highest Package ₹XX Lakh"
यातलं सगळंच खोटं आहे असं अजिबात नाही.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा.
तुम्हाला काहीतरी विकू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडून मिळणारी माहिती तपासून घेणं शहाणपणाचं असतं.
फक्त, "Highest Package किती?" विचारू नका. फक्त कॉलेज चे प्लेसमेंट रेकॉर्ड बघू नका
हेही विचारा...
तुम्ही प्रवेश घेत असलेल्या Branch चं Median Package किती?
या Department मधून किती मुलांना नोकरी मिळाली
कोणत्या कंपन्या आल्या?
कोणत्या Roles साठी आल्या ?
किती विद्यार्थी Unplaced राहिले?
College मोठं आहे हे ठीक...
पण तुम्ही ज्या Department मध्ये जाणार आहात ते किती चांगलं आहे?
तिथली Faculty कशी आहे?
Labs कशा आहेत?
विद्यार्थी प्रत्यक्षात काय Projects करत आहेत?
Internships कुठे मिळत आहेत?
हे प्रश्न विचारायला सुरुवात केली की चकचकीत Brochure च्या मागचं खरं College दिसायला लागतं.
आणि अजून एक सापळा आहे
तीन दशकांपूर्वी मेकॅनिकल इंजिनीरिंग फॉर्म मध्ये होते
गेले एक दशक सगळ्यांना CSE आवडायला लागले आहे
मग Data Science आलं.
आता AI आलं.
Machine Learning आलं.
उद्या आणखी काहीतरी येईल.
आज Engineering ला Admission घेणारा विद्यार्थी कदाचित 2065-70 पर्यंत Professional Life मध्ये असेल. आजच्या Placement Trends वरून 2045 मध्ये कोणती Branch सर्वात जास्त पैसे देईल हे आपण खरंच सांगू शकतो का? मला नाही वाटत.
म्हणून आज Market मध्ये काय Trend आहे एवढ्यावर Engineering Branch निवडू नका.
आणि एखादी Branch आज फार Glamorous वाटत नाही म्हणून ती नाकारूही नका.
तुमचे Aptitude, तुमचं कुतूहल, तुम्हाला सोडवायला आवडणारे Problems आणि तुम्हाला करायला आवडणारं काम...यांच्याशी साधारण जुळणारी दिशा आधी शोधा.
आणि मग त्या दिशेला नेणारं तुम्हाला मिळू शकणारं सर्वोत्तम College शोधा.
दोन Colleges जवळपास सारख्या दर्जाची असतील तर
मी Branch ला प्राधान्य देईन.
दोन Colleges मध्ये जमीन-अस्मानाचा फरक असेल आणि तुम्हालाही Branch बद्दल फारशी स्पष्टता नसेल? मी चांगल्या College चा गंभीरपणे विचार करेन.
प्रत्येक विद्यार्थ्याला लागू पडेल असा एकच Formula नाही.
आणि कदाचित हाच या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
तुमच्या करिअर निर्णयाची सुरुवात Cut-off च्या टेबलपासून नाही... तुमच्यापासून व्हायला हवी.
चांगली गाडी तुमचा प्रवास अधिक आरामदायी, वेगवान आणि आनंददायी नक्कीच करू शकते. शक्य असेल तर उत्तमातली उत्तम गाडी निवडा.
पण त्याआधी एकदा तिच्या पाटीकडे नीट बघा...
ती जातेय कुठे? तुम्हाला ज्या गावाला जायचेय त्याच गावाला जातेय ना ?
कारण गरज पडली तर प्रवासात मध्ये गाडी बदलता येते.
पण आयुष्यातली काही वर्षं एखाद्या चांगल्या मस्त गाडीत बसून...चुकीच्या दिशेने प्रवास करण्यात गेली आहेत हे उशिरा लक्षात येणं फार महागात पडू शकतं.
— अविनाश देशमुख
.png)
Comments
Post a Comment