करियर शिवबाचे
जन्माला यायच्या आधीच आई जिजाऊंनी येणार्या बाळाने काय करायचे याचे स्पष्ट स्वप्न पाहिले होते आणि वयाच्या पाहिल्या 10 वर्षात शिवबाने सुद्धा तेच करियर करायचे नक्की केले होते..
जेव्हा करिअरचे ध्येय महान असते ना तेव्हा आई वडिलांनी ते करिअर मुलांवर थोपले तर त्यात काहीही चुकीचे नाही हेच शिवबाने सिद्ध केले आहे..
ज्या वयात पालक मुलामुलींना साधे सिनेमा बघायला एकटे पाठवत नाहीत, जरासे खरचटले तर दवाखान्यात नेवून मोठ्ठी पट्टी बांधुन 4 दिवस शाळेला सुट्टी घेतात त्या 14 व्या वर्षी शिवबाने 4 मित्रांच्या संगतीने रायरेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक केला होता आणि त्या कोवळ्या मावळ्यांनी आपले करिअर पक्के केले होते... 🚩🚩🚩
ज्या वयात आजकाल मुलेमुली करिअर संबंधी विचार करायला सुद्धा घाबरतात त्या वयात शिवबाने हाताशी मूठभर सवंगडी घेवून प्रचंडगड म्हणजेच तोरणा जिंकला... आणि आपल्या करिअरची - स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली...
खरेतर वडिलांच्या पुण्याईवर शिवबाला आदीलशाही किंवा निजामशाही या दोन मोठ्या कंपन्या मध्ये सहज मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती.. असती नव्हे offer letters सुद्धा आले होते त्यांच्याकडे..
पण नाही, त्याचे ध्येय एव्हढे परमोच्च होते की त्यापुढे या दोनच काय पण ईस्ट इंडिया कंपनी, मोगलाई अशा शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या त्याने धुडकावून लावल्या असत्या...
कारण त्याला त्यांची चाकरी मुळात करायचीच नव्हती.
या कंपन्यांनी समाजामध्ये घातलेला धुमाकूळ त्याला मोडून काढायचा होता.. त्यांची मान मोडून त्यांच्या छाताडावर पाय ठेवून आपल्या समाजाची- आपल्या मावळ्यांची, शेतकर्यांची अठरा पगड जातीतील आपल्या बांधवांची स्वतःची कल्याणकारी सर्वसमावेशक कंपनी उभी करायची होती..
असे काम त्याच्या घरात यापुर्वी कुणी केले नव्हते... त्याच्या वडिलांची तीव्र इच्छा असून त्यांना सुद्धा हे जमले नव्हते..
हा विचार पक्का केला तेव्हा त्याच्याकडे काहीच भांडवल नव्हते, अनुभव नव्हता, आणि यशाची उदाहरणे म्हणाल तर ती हजारो वर्षापूर्वी राम आणि कृष्णाच्या कथां मध्ये होती.
जवळचे बरेच नातेवाईक विरोधात होते... कशाला हा उद्योग.. आपल्या घराण्यात कुणी असे काही केले नाही... काय खात्री हे त्याला जमेल?
त्याने सुद्धा चांगली स्थिर पगाराची नोकरी करावी, निमुटपणे काम केले तर पाच हजारी, सात हजारी.. दस हजारी सरदार असे मस्त प्रमोशन त्याला मिळाले असते.. चांगल्या उच्च घराण्यातल्या मुलीशी लग्न करून उत्तम संसार करता आला असता... शेकडो एकर जमीन जुमला, हजारो घोड्यांचे तबेले, अनेक चौसोपी वाडे बांधता आले असते आणि आयुष्य कसे अगदी सुखासीन झाले असते..
म्हणुन त्याने स्वतःचा बिझनेस करायच्या भानगडीत पडू नये यासाठी यांनी आटोकाट प्रयत्न केले..
( खरे तर त्याच्या कंपनी मुळे या सार्या नातेवाईकांचे अस्तित्व धोक्यात येणार होते हे त्यांनी ओळखले होते)
पण साक्षात आई भवानी जन्मदात्री च्या रुपाने पाठीशी भक्कम उभी असताना माघार घेईल तो शिवबा कसला...
त्याला आदिलशाही मधून येणार्या मलमली अंगरख्या पेक्षा त्याच्या गावातल्या धनगराने स्वतःच्या हाताने आनंदाने विणलेला कांबळीचा अंगरखा जास्त मोलाचा होता...
नोकरीतील त्याची सुबत्ता पाहून त्याच्याशी लग्न करणार्या दोन चार लक्ष्मींचे आयुष्य उजळून टाकण्यापेक्षा उभ्या भारतवर्षांतल्या लाखो आया बहिणींचा स्वाभिमान त्यांची अब्रू आणि त्यांचा आनंद त्याला जास्त महत्वाचा होता...
त्याच्या मालकाने जनतेवर केलेल्या अत्याचाराच्या, त्यांच्या शरीराच्या आणि भावनांच्या चितेवर भाजून त्याच्याकडे फेकलेल्या पुरणपोळ्यांपेक्षा त्याच्या गावातील फाटक्या शेतकर्याने स्वाभिमानाने, आनंदाने स्वतःच्या रानात पिकवलेल्या आणि त्याच्या घरच्या लक्ष्मीने मायेने चुलीवर थापलेल्या ज्वारीच्या भाकरीचे मोल त्याच्यासाठी जास्त होते...
ध्येय ठरले होते...
मार्ग दिसत होता...
"हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" असे म्हणत त्याने खेळ मांडला...
एखाद्या स्वप्नासाठी सर्वस्व झोकून देणे म्हणजे काय हे समजायचे असेल तर शिवबा कडे बघावे...
धोका फक्त आर्थिक सामाजिक नव्हता तर साक्षात अस्तित्वाचा होता..
पावला पावलावर मृत्यू सापळा रचून बसलेला होता...
आणि मृत्यू फक्त त्याचा नाही तर सोबतीला असलेल्या सर्वांचा..शेकडो कोस दूर असलेल्या वडिलांचा सुद्धा...आणि ज्यांच्यासाठी हा खेळ मांडला त्या जनतेचा सुद्धा.
पण जेव्हा ध्येय हे साक्षात मृत्यू पेक्षा लाख पटीने सुंदर असते तेव्हा धोका सुद्धा सुंदर दिसतो माणसाला...
शिवबा ते छः शिवाजी महाराज हा प्रवास उण्यापुऱ्या 50 वर्षाहून थोडा कमीच..
पण काय काय नाही पाहिले या प्रवासात...
अक्षरशः धोक्यांनी भरलेला प्रत्येक दिवस, अनेक अपयशे, कोणताही निर्णय घेताना होणारी जीवघेणी घालमेल, अनिश्चितता... यशाची कसलीच खात्री नाही.. जवळच्या माणसांनी दिलेला दगा.. जिंकलो जिंकलो म्हणत असताना पत्करावी लागलेली हार... पराक्रमाची शर्थ करून.. अनेक हिरे या होमात बळी देवून मिळवलेले स्वराज्य... थोडीशी उसंत घेता घेता निम्म्यापेक्षा जास्त परत शत्रूच्या घशात घालावे लागले...
पोटच्या मुलाचे शीर थाळीत ठेवून बादशहाला सादर करावे लागले...
पण पठ्ठ्या मागे नाही हटला...
पुन्हा कंबर कसली आणि जोमाने कामाला लागला..
तोपर्यंतच्या प्रवासात जिवाला जीव लावणारे इतके वाघ जमवले होते.. त्यांनी जे रान पेटवले, जो राजांचा अश्वमेध उधळला तो आदील शाही, निजाम शाही, मोगलाई, East इंडिया कंपनी, Portugese, Dutch या सार्या कंपन्यांची संपूर्ण पुरती वाट लावेपर्यंत थांबलाच नाही..
40 वर्षात शिवबाने जे केले ते आज 350 वर्षानंतर सुद्धा डोळे दीपवतेय...
यांनी करिअर सुरू केले तेव्हा काहीच नव्हते...
फक्त एक भव्य दिव्य स्वप्नं त्यांनी बघितले... ते उराशी कवटाळले.. स्वत:च्या मनगटावर आणि आई भवानीच्या आशिर्वादावर पूर्ण विश्वास ठेवला... आणि चालायला लागले..
मग नियतीने, निसर्गाने समाजाने सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेले....
याच शिवबाच्या मातीत जन्मलेली माणसे मुले जेव्हा कुणी संसारात, कुणी एखाद्या परीक्षेत, अपयश आले म्हणून किंवा येईल म्हणुन आत्महत्या करतात तेव्हा काळजाला चरे पडतात... आतड्याला पीळ पडतो
फोटोत सुद्धा महाराजांच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नाही...
आपण शिवबा चे वारस?
आजही पुन्हा तशीच परिस्थिती आहे.. फक्त आजचे आदीलशहा, निजामशाह, गोरे हे तुमच्या समोर नाहीत...
कदाचित ते तुमच्या आत आहेत...
युद्ध क्षेत्र बदललेत..
युद्ध सामग्री बदललीय...
उद्दिष्टे आणि स्वप्ने बदलली आहेत.
पण लढाई मात्र लढायची आहेच...
तुमचे तुमचे ध्येय तुम्हाला गाठायचे आहेच..
फक्त हे करायला तुमच्यातला शिवबा जागा आहे का...?
आज शिवजयंतीला तुमच्यातला शिवबा पुन्हा एकदा जन्म घेईल का?
जय भवानी जय शिवाजी...
अविनाश देशमुख
करिअर कोच
BOLDNET India
9657600076
Comments
Post a Comment