Salute to Feminine Power : Navratri day 9



गेले नऊ दिवस आपण विविध कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या नवदुर्गांबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या करिअर बद्दल जाणून घेतलं. विविध करिअर क्षेत्रातील या नव दुर्गांकडून प्रेरणा घेवून आपल्या घरातून अशी एक नव दुर्गा निपजली तरी माझे कार्य सफल झाले असे मी म्हणेन

 तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मेसेज करून हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. असा प्रतिसाद मिळाला की लेखकाचा उत्साह द्विगुणीत होतो 


आज या शृंखलेतले शेवटचे पुष्प. कोणाबद्दल लिहावे आणि काय लिहावे  हा विचार करत असताना बराच वेळ वेगवेगळे विचार करून सुद्धा काही समाधान होत नव्हते .नेमकं काय लिहावं आणि कुणासाठी लिहावं हे सुचत नव्हतंच .दोन तीन तासांनी तर इंटरनेट सुद्धा कंटाळले आणि मग थोड्यावेळाने सुचले... 

अगदी मनासारखे सुचले 

आजचे पुष्प हे तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात हमखास असणाऱ्या नवदुर्गेसाठी... 

आपल्या सगळ्यांना कर्तुत्वान व्यक्तीला त्यांच्या कर्तुत्वाला त्यांच्या पुरस्कारांना सलाम करायची सवयच लागली आहे आणि म्हणून एका बाजूला 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥


 ही शिकवण असताना सुद्धा आपण कौतुक मात्र तिचेच करतो जिने  बक्षीस मिळवलं.. काहीतरी करून दाखवलं. 

लौकिक अर्थाने ज्यांनी तसं काही करून दाखवलं नाही त्यांना मात्र आपण विसरतो 

दुसऱ्याच्या अपूर्ण  जगण्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी स्वतःच्या पूर्णत्वाचा बळी देणाऱ्या, दुसर्‍याच्या स्वप्नांना पंख प्राप्त करून देण्यासाठी स्वतःला मातीत गाडून  घेणाऱ्या असंख्य नवदुर्गांना काहीच किम्मत नाही का? 

म्हणूनच आजचा दिवस तुमच्या माझ्या आयुष्यातील या प्रत्येक नवदुर्गेसाठी 

कोण आहे ही नव दुर्गा? 


ती नवरा गैरसोयीच्या ठिकाणी नोकरीला आहे म्हणून मुलांना घेऊन पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांचे शैक्षणिक आयुष्य घडवणारी एखादी जिद्दी जिजाऊ आहे 

ती आपल्या एका अपंग मनोरुग्ण मुलाला दहा घरची धुणी भांडी करून आयुष्यभर सांभाळणारी एखादी खंबीर कमल  आहे

घरची आर्थिक परिस्थिती पुरेशी चांगली  नसल्याने लहान  भावासाठी स्वतःचे शिक्षण सोडून देणारी एखादी अनिता आहे

किंवा वडील वारल्यानंतर आईच्या मदतीने आज्जीला आणि  चार-पाच भावंडांना सांभाळण्यासाठी अविवाहित  राहणारी एखादी संगीता आहे.. 

नवऱ्याच्या चुकांमुळे आपल्याला झालेल्या एड्सचा सामना करत असतानाच त्याच मरणासन्न नवऱ्याबरोबर दोन कोवळ्या जीवांना संभाळण्यासाठी साक्षात यमाला सुद्धा दाराबाहेर ताटकळत उभा ठेवणारी एखादी शालन आहे 

आणि अतिशय श्रीमंत कर्तुत्ववान घराण्यात राहून सुद्धा एकाकीपण सोसणारी आणि तरीही त्याच घराण्याची मान मर्यादा राखण्यासाठी सतत धडपडणारी एखादी अनामिका आहे.. 

आजची नवदुर्गा एखाद्या अहंकारी सणकी बापाची एक समंजस हुशार लेक ज्योत्स्ना  आहे 

आणि  प्रेमळ वडिलांना रात्रीचे 12 वाजले तरी जेवण गरम करून देण्यासाठी जागणारी एखादी  सई  सुद्धा आहे.. 

मोडकळीस आलेला संसार केवळ आपल्या मुलासाठी एका हातावर पेलणारी एखादी नंदिनी सुद्धा आहे.. 

इच्छा नसतानाही घराण्याच्या आग्रहा खातर अभिमन्यूशी लग्न करून कृष्णाला आपला प्रियकर मानणारी राधाही आहे अन आयुष्यभर कृष्णामध्येच हरवून गेलेली मीरा सुद्धा आहे 

महालात राहून वनवास भोगणारी उर्मिला पण आहे तर पुरुषोत्तमाशी लग्न करून आयुष्यभर जंगलात भटकलेली सीता सुद्धा आहे.. 

एका रात्रीचा सहवास देऊन त्यागलेली तरीही त्याच  भीमावर आयुष्यभर प्रेम करणारी  आणि  त्याच्या पुत्राच्या  मनात बापाबद्दल अपार आदर जोपासणारी हिडिंबा सुद्धा आहे.. 

अहंकारी क्रूर रावणाबरोबर राहूनसुद्धा आपल्यातला चांगुलपणा जपणारी मंदोदरी आहे आणि कोरोना काळात मृत्यूशी दोन हात करून आपल्या सत्यवानाला माघारी आणणारी सावित्री सुद्धा आहे 

आणि शेवटी तुमच्या कार्यकर्तृत्वाची पताका जगभर फडकावी म्हणून तुमच्या संसाराच्या गाड्याची जबाबदारी घेतलेली बायको सुद्धा आहे

या तुमच्या आमच्या आयुष्यातल्या दुर्गा सुद्धा तितक्याच वंदनीय नाहीत का? 

म्हणुन आजचं नमन आणि प्रणाम या सर्व दुर्गांना 

लौकिक अर्थाने त्या यशस्वी असो किंवा नसोत पण कुणासाठी तरी  आपल्या आयुष्याला कापरासारख्या पेटवणार्‍या या साऱ्या नवदुर्गा मला खूप मोठ्या वाटतात...

आजच्या या ९व्या  दिवशी या सर्व सिद्धीदात्री नवदुर्गांना सादर प्रणाम...


Avinaash Deshmukh

Youth and career Coach

Comments

Popular posts from this blog

JOMO : The Antidote India has for FOMO

Diminishing Femininity: The Problem Hitting Employment and Human Well-Being.

From Hobbies to Personal Brand: Why Profile Building is the Real Game-Changer for Youngsters