Salute To FEMININE POWER : Navratri Day 1
स्त्री शक्तीच्या संपूर्णतेचा हा नऊ दिवसांचा प्रवास एका वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
या नऊ दिवसात पाहूया स्त्रीशक्तीची विविध रूपे. अगदी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ह्या स्त्रिया लौकिकार्थाने फार फार मोठ्या नाहीत. खूप पैसे कमवत नाहीत कदाचित अजून. सगळ्याजणींना समाजाने खूप मानसन्मान दिलाय असेही नाही.
पण त्या चालताहेत...
एक एक व्रत घेऊन. कुणी व्यवसायातून, कुणी कलेतून, कुणी नोकरीतून तर कुणी अगदी किचन मधून आपल्या विविध रंगांचे दर्शन घडवत आहेत.
आपल्या शक्तीच्या जागरातून समाजासाठी काहीतरी करतायत.
यांच्या आयुष्याकडे बघितलं की डोळे दिपत नाहीत, दडपण तर मुळीच येत नाही...
उलट त्या जवळच्या वाटतात अगदी... अरे हिने केलं मग आपण सुद्धा सहज करू की.. असे सुद्धा वाटू शकते.
तर बघूया मातेची ही विविध रूपे आणि विविध रंग
आज पांढरा - शैलपुञीचा
मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये आर एम ओ म्हणून काम करत असताना तिला एक फोन आला "डॉक्टर माझ्या पत्नीला बाळंतकळा सुरू झाल्यात मला काही सुचत नाहीये प्लीज माझी मदत करा".
कोरोनाचा लॉकडाऊन सुरू होऊन आठ दिवस झाले होते.
तिचे हॉस्पिटल Covid साठी राखीव होते, तिला किंवा कोणालाच हॉस्पिटल मधून बाहेर पडता येत नव्हते.
त्या अडकलेल्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा घराबाहेर पडणे शक्य नव्हते.. घरात दुसरे कुणी नव्हते..
सर्व काही बंद, चोहीकडे भीतीचं वातावरण होतं पण तिला मात्र एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून तिचं कर्तव्य स्वस्थ बसू देत नव्हतं...
आणि तिला सुचलं..... तिने एक ट्विट केले आणि पुढच्या चार तासात एका हॉस्पिटलने ॲम्बुलन्स पाठवून त्या महिलेला मदत केली.
केवळ एक जीव वेदनेतून सुटला नाही तर एक नवीन जीव अवतरला..
"डॉक्टर मी जरी या मुलाला जन्म दिला असला तरी तुम्ही त्याला जीवदान दिलं आहे म्हणून त्याच्या पहिल्या वाढदिवसाला सगळ्यात पहिला मान तुमचा" डोळ्यात आनंदाश्रू घेऊन त्या महिलेने डॉक्टर मालविका निरजचा सन्मान केला तेव्हा मालविकाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले नसते तरच नवल.
हो आजची गोष्ट आहे मुंबईतील एका उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या आणि डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर मालविका निरज यांची..
वरील घटना डॉक्टर मालविकाच्या संवेदनशीलतेची केवळ एक छोटीशी झलक आहे एमबीबीएस नंतर काही काळ खाजगी वैद्यकीय सेवा पुरवठा कंपन्यांमध्ये सेवा दिल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये त्या मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये आर एम ओ म्हणून रुजू झाल्या.
भारतातले एक उत्तम हॉस्पिटल आणि त्यात शासकीय वर्ग 2 ची नोकरी..
आयुष्य सेट व्हायला सुरुवात होत होती बघता बघता सप्टेंबर 2020 उजाडले आणि एक दिवस डॉक्टर मालविकाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. कारण काय तर मुंबईतील कुलाबा धारावी बांद्रासारख्या परिसरामध्ये चोहोबाजूंनी कुबेराच्या लखलखत्या ऐश्वर्याच्या तळाशी असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये... जिथे अंबुलन्स काय साधी टू व्हीलर सुद्धा जात नाही अशा गटार वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी काम करायचे म्हणून...
"माझी गरज त्यांना जास्त आहे... जर पेशंट डॉक्टर पर्यंत पोहोचत नसेल तर डॉक्टरने पेशंट पर्यंत पोचले पाहिजे... तरच मला भारतातील वैद्यकीय सेवेविषयी बोलण्याचा अधिकार आहे असा साधा सोपा पण प्रभावी विचार घेऊन डॉक्टर मालविका ने गल्ली क्लिनिक ची.. ( Gully Clinic) संकल्पना मांडली हर गल्ली हेल्दी गल्ली #hargullyhealthy हे मिशन घेऊन काम सुरू केलं. कुलाब्यातील गीतानगर सेवा वस्तीमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली.
जिथे पांढरपेशा वर्ग कधी जात नाही.. गेलाच तर नाक चिमटीत धरून जातो आण पटकन बाहेर येतो अशा ठिकाणी एकटीने तिथल्या गलिच्छ गल्ल्यांमध्ये नाल्याच्या बाजूला टेबल टाकून तिथल्या लोकांना प्राथमिक वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. तीन महिन्याचे 90 रुपये एवढेच शुल्क घेते ती.
अर्थात या उत्पन्नात तिच्या क्लिनिकचा खर्च भागत नाहीच म्हणून ती पायाला भिंगरी लावून गळ्यात लॅपटॉप माहितीपत्रके आणि पाण्याची बॉटल असलेली झोळी घेऊन मुंबईच्या लोकलने मुंबईभर फिरते आणि गल्ली क्लिनिक साठी मदत गोळा करते
काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे मुंबईत खारघर मध्ये राहते
नवरा मात्र परदेशात असतो. वडील आणि बहीण सुद्धा परदेशात राहतात.
ही मात्र म्हणते कशी, माझ्या देशाचे ऋण मला फेडायचं आहे, त्यामुळे देश सोडून जाण्याचा प्रश्नच नाही
तिच्या या कामातून आणि तिच्या बोलण्यातून प्रेरणा घेऊन तिला आत्तापर्यंत चार डॉक्टर्स जॉईन झाले आहेत.
तिची टीम वाढते आहे.. हळूहळू कामाचा व्याप सुद्धा वाढतोय.
ई- गल्ली क्लिनिक सुरू केले आहे.. फक्त वैद्यकीय सेवाच नाही तर या वस्त्यांमधील लोकांच्या समस्या ऐकण्याचे त्यांची सखी होऊन भावनिक फुंकर घालण्याचे दैवी कार्य सुद्धा मालविका करते.
तिच्या या कार्यात तिला हळूहळू सुशिक्षित सहृदयी लोकांची साथ मिळायला लागली आहे.
कमाल आहे ना, लाखो करोडो रुपये आणि सोबत त्याहून जास्त मान सन्मान मिळवण्याची सर्व साधने आणि संधी असताना सुद्धा एक विशीतील तरुणी हा मार्ग चोखाळते आहे..
किती आश्वासक आहे ना हे..
दरवर्षी भारतातून सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असतं साधारण एक लाख विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात देखील करतात म्हणजे दरवर्षी साधारण एक लाख डॉक्टर तयार होतात.
यातले बहुतेक जण कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये काही वर्ष नोकरी अन मग मोठे कर्ज घेवून हॉस्पिटल उभे करतात.. आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी...काय काय करावे लागते
वैद्यकीय सेवेकडे असेही पाहिले जावू शकते हे आपल्याला डॉ आमटे यांनी शिकवले आहेच.. पण त्यांच्या नंतर किती जण असे करू शकले..
माहीत नाही
पण एका मालविकेने सुरुवात तर केलीये....
स्त्री शक्तीच्या या एका अनोख्या रूपास आज पहिल्या दिवशी सविनय प्रणाम.....
अविनाश देशमुख
करिअर कोच
Team BOLDNET INDIA
Comments
Post a Comment