"गुड इव्हनिंग काका
तुम्हाला कधी वेळ आहे ? मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. "
अदितीचा व्हाट्सअप मेसेज वाचून मी थोडा विचारातच पडलो.. आता काय बरं बोलायचं असेल हिला ?
आदिती म्हणजे साधारण पाचेक वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांबरोबर माझ्याकडे आलेली एक शांत गोंडस मुलगी. तेव्हा ती दहावीत होती. माझ्या एका करिअर मार्गदर्शन सेमिनार मधून प्रेरित होऊन वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्यापर्यंत पोहोचले होते .
तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन केले होते.
तेव्हा छान गप्पा झाल्या होत्या आई ग्रॅज्युएट,वडील बारावी उत्तीर्ण पण व्यवसायात उत्तम जम..
"आमचे काही म्हणणे नाही बघा, तिला जे करायचे आहे ते तिने करावं… आम्ही पूर्ण सपोर्ट करू. पण जे करेल ते मात्र उत्तम करावे." माझ्या सेशन नंतर आदितीचा खुललेला चेहरा बघून तिचे वडील बोलून गेले होते.
नववी पर्यंत सीबीएससी शाळेत 90% पेक्षा जास्त मार्क पडत होते तिला
मी तिचा स्वभाव, तिचे व्यक्तिमत्व, तिच्या क्षमता आणि तिची आवड आणि तिचा कल या सर्वांचा अभ्यास करून तिने शक्यतो ह्युमॅनिटी किंवा ज्याला आपण आर्टस् म्हणतो या विषयात शिक्षण घेऊन पुढे करिअर निवडावे असा सल्ला दिला होता.
आदिती ची कळी खुलली होती आई सुद्धा आनंदी दिसत होती
" दहावीला चांगला अभ्यास कर आदिती. फर्ग्युसन आर्ट्स ॲडमिशन मागच्या वर्षी 93% ला क्लोज झाले होते. मी जाता जाता तिला थोडं सावध सुद्धा केलं.
ऑल द बेस्ट असे म्हणत मी सेशन आवरते घेतले होते
विद्यार्थी आनंदी मनाने आणि चेहऱ्याने आपल्या केबिन मधून बाहेर जातानाचा क्षण मात्र मला बारा हत्तींचे बळ देत असतो.
त्यानंतर जवळपास आठ दहा महिन्यांनी वडिलांचा फोन आला होता तिच्या. त्यांच्या भावाच्या मुलासाठी, तेव्हा इतर गप्पा झाल्यावर मी सहज विचारले आदितीचं काय चाललंय. फर्ग्युसन ला घेतलं का ऍडमिशन ?
अं.. हो …नाही. त्याचं काय झालं, नंतर घरी आल्यावर आम्ही सर्वांनी चर्चा केली तेव्हा आदिती म्हणाली की मी इंजिनीअरिंगचं करते.
आम्ही म्हणालो ठीक आहे मग आम्ही पुण्यात एका इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा घेतली. तिची जेईईची तयारी चालू आहे, छान कॉलेज आहे राहणे, खाणे, अभ्यास, क्लासेस सर्व काही एकाच कॅम्पस मध्ये आहे चांगली रुळली आहे आणि खुश आहे आहे ती." आधी थोडेसे चपापत आणि नंतर आत्मविश्वासपूर्वक वडील बोलून गेले
माझे आश्चर्य हलकेसे लपवत मी तिला शुभेच्छा कळवायला सांगितले त्यांना. नंतर मात्र त्यांनी संभाषण आवरते घेतले आणि फोन कट केला
पुढे आदितीला बेंगलोरला एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ला ऍडमिशन मिळाल्याचं समजलं.जे काही घडलं ते फारसे नवीन नव्हतं मला, पण या केसमध्ये थोडे आश्चर्य जरूर वाटले, असो पालकांनी मुलांवर गोड बोलून प्रभाव टाकण्याचे काही प्रकार तोपर्यंत मी अनुभवलेले होते.
अदितीच्या व्हाट्सअप मेसेज ला काय उत्तर द्यावे हा विचार करताना चार पाच वर्षांपूर्वीची ही घटना डोळ्यासमोरून काही क्षणात सरकून गेली
"आदिती आता माझं एक सेशन आहे आपण साडेसातला बोलू " असं मी तिला कळवलं आणि एक छानसा स्मायली सुद्धा पाठवला
"ओके काका" तिचे क्षणात उत्तर आले
बरोबर साडेसातला फोनची रिंग वाजली
"हाय आदिती कशी आहेस काय म्हणते इंजीनियरिंग" ?
" ठीक आहे काका "
मॅडम चा आवाज उदास होता
माझ्या अनुभवी कानांनी ताडलं. वातावरण हलक ठेवत मी तिला विचारलं "बोल चॅम्प काय म्हणतेस"
"काका मला कळत नाही . काहीच खूप टेन्शन आलंय "
"कशाचे ? काय झालं ? ऑल वेल ?
कुठे आहेस तू सध्या बंगलोरला की गावाकडे ?" मी थोड्याशा काळजीतच विचारले
"घरीच आहे अजून. ऑनलाईन कॉलेज चालू आहे"
ओके मग काय प्रॉब्लेम ?
पप्पा खूप रागावले आहेत आई बोलत नाहीये.. मला घर सोडून निघून जावेसे वाटतेय कुठेतरी..
काय झाले ते सांगशील का? माझ्या मानत शंका कुशंका दाटल्या
"काका मला इंजिनिअरिंग नाही करायचं. आवडत नाहीये अजिबात आणि आता तर झेपत पण नाहीये खूप कंटाळवाणं वाटतं,अभ्यास करायचा म्हटलं की टेन्शन येतंय आणि काय करावे हेच सुचेना.
माझ्या सेकंड सेमिस्टर चे दोन विषय राहिलेत हो" आदितीने बिचकत बिचकत सांगितलं
"अगं पण तूच इंजीनियरिंग ला जायचं ठरवलं होतंस ना? मला तुझे पप्पा म्हणाले होते"
"हो काका, पण खरं सांगू का? मी पप्पांच्या दडपणाखाली तो निर्णय घेतला होता. त्या वेळी आर्ट्स करायचे म्हणून मला खूप मस्त वाटलं होतं. तुमच्याशी बोलल्यावर माझा पुढचा मार्ग मला स्पष्ट दिसू लागला होता पण तुमच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून पप्पा गप्प गप्प होते. बर्याच वेळाने त्यांनी
"आर्ट्स करून काय करणार आर्ट्स मध्ये काही करिअर असते का? असे म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या.
ते असेही म्हणाले की "मला शिकता नाही आलं पण माझ्या मुलीने उत्तम इंजिनीयर व्हावे हे माझे स्वप्न आहे"
मी त्यांना आर्ट्स मध्ये सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स आहेत हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण….
पुढे दोन महिने घरात वातावरण तंग होते शेवटी मी इंजीनियरिंग करायचा निर्णय घेतला. आदिती आता अगदी रडवेल्या आवाजात बोलत होती अकरावी बारावी सायन्स ठीक होते फर्स्ट इयर इंजीनियरिंग सुद्धा ठीक होते पण आता मात्र माझं मन लागत नाहीये पण मला काही गोष्टी झेपत पण नाहीत…"
तिने मोठा पॉज घेतला
मग तुला काय करावं वाटतंय?
मी तिला स्पष्टच विचारलं
"काका मला दहावीपासून असं वाटतंय की मी सायकोथेरपिस्ट व्हावे मला काऊन्सेलिंग करून टीनेजर्स मुलांना गाईड करायला आवडेल. नववी दहावीला जे Bullying मला सहन करावे लागले होते तसे खूप मुलांना सहन करावे लागते.
नंतर त्यांना कोणाशी तरी बोलायचं असतं पण असं कोणी नसतं बोलायला तेव्हा…
जीव गुदमरून जातो काका.." आदितीचा कंठ दाटून आला होता. "मला वाटतं अशा मुलांना मुलींना मदत करावी आणि मी ती खूप चांगली सुद्धा करू शकेन असं मला वाटतं" आदितीच्या या बोलण्यात एक ठामपणा, एक उमेद होती.
नंतर जवळपास अर्धा तास आम्ही बोललो. Engineering मध्येच सोडून अन्य मार्ग घेणे व्यवहार्य नव्हते, हे तिलाही कळत होते पण तिला Engineering चाच तिटकारा आला होता..मी तिला इंजिनिअरिंग मधून तिचं स्वप्न पूर्ण करायचा थोडा अवघड पण नाविन्यपूर्ण शक्यता असलेला मार्ग दाखवला.
तिची कळी पुन्हा एकदा खुलली आणि पुन्हा फोन करेल असे आश्वस्त करून तिने माझा निरोप घेतला
मी मात्र पुन्हा एकदा विचारात पडलो.. काही वर्षापूर्वी पालक सरळ-सरळ जबरदस्ती करत होते आम्ही म्हणतोय तेच कर , तेव्हा तरूणांना शत्रु समोर दिसायचा. आता मात्र एकीकडे मोकळेपणा दाखवायचा आणि आडमार्गाने ब्लॅकमेल करायचे. मुलांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना प्रभावित करणारे चतुर पालक बऱ्यापैकी भेटू लागले आहेत.
कधी गोड बोलून कधी भीती दाखवून कधी त्यांच्या चुकांची हत्यारे वापरून तर कधी डोळ्यात पाणी आणून आपल्याला अपेक्षित निर्णय मुलांना घ्यायला लावणाऱ्या अशा पालकांना काय म्हणावं ?
हे पालक मुलांच्या यशाची आनंदाची समाधानाची खात्री देतात का? खचितच नाही
मग का असं करत आहेत ?
धोपट मार्गा वरून चालल्याने कदाचित उपाशी राहणार नाहीत मुलं, पण त्या जगण्याला जगणे म्हणायचं का?
पालकांनो, तुम्ही ज्या वेळेस तरुण होता तुम्ही ज्या वेळेस कॉलेजात होता त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे तुमचा उद्देश कितीही चांगला असला तरी तुमची अपुरी माहिती, ज्ञानाची कमतरता तुमच्या मुलाचं करिअर धोक्यात आणू शकते त्याच्या करिअरची दिशा भरकटू शकते. जग फक्त बदलतच नाहीये तर बदलाचा वेग प्रचंड वाढला आहे एखाद्या करिअर साठी शिक्षण पूर्ण करून त्या करिअरमध्ये सुरुवात करायच्या आत ते करिअर संपुष्टात येते किंवा प्रचंड बदलतेय.
त्यांच्या आनंदासाठी तुम्ही हे सगळं करत आहे असं तुम्हाला वाटत असलं तरी मुलांना त्याच्यातून आनंद मिळणार नाही समाधान मिळणार नाही.. उलट त्यांचा स्ट्रेस वाढतच जातोय त्यामुळे कृपया असं काही करु नका.
एका बाजूला तुम्ही कौन्सिलर ची मदत घेता आहात योग्य माहिती घेता आहात आणि त्यानंतर सुद्धा केवळ तुम्ही ती गोष्ट अनुभवलेली नाहीये, तुम्हाला पटलेली नाहीये म्हणून तुम्ही तिला नाकारू नका. जग प्रचंड वेगानं बदलतंय दहा वर्षापूर्वी ज्या नोकऱ्या अस्तित्वात नव्हत्या आपल्या कल्पनेत सुद्धा नव्हत्या अशा प्रकारच्या नोकऱ्या आणि अशा प्रकारचे व्यावसाय या मुलांसाठी तयार होत आहेत.
अनेक नोकऱ्या अनेक व्यवसाय जे वीस वर्षापूर्वी खूप उत्तम चालत होते ते आता पूर्णपणे बंद पडलेले आहेत. आज जी मुलं पाचवी किंवा सहावी मध्ये आहेत ती मुलं अशा क्षेत्रामध्ये करिअर करणार आहेत जी क्षेत्रे आज अस्तित्वात सुद्धा नाहीयेत त्यामुळे आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारावर आपल्या मुलांचे भवितव्य बिघडविण्यास कारणीभूत ठरू नका ही कळकळीची विनंती.
मुलांना कशासाठीतरी तयार करण्यापेक्षा त्यांना कशासाठीहि तयार करूया.
खूप स्मार्ट आहेत आजकालची ही मुले..आपल्या पिढीच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडची आहेत.. त्यांना त्यांचे विश्व बनवू द्या.. धडपडू द्या.. अपयशी होवू द्या.. आवडीच्या क्षेत्रातले अपयश सुद्धा खंबीरपणे पचवतील ही मुले…
पण त्यानंतर मिळणारे यश हे उत्तुंग असेल.. केवळ संपत्तीच्या नाही तर आनंद समाधान सामाजिक सत्कार्य ह्या सगळया आघाड्यांवर उत्तुंग यश मिळवतील ही मुले.
फक्त त्यांच्या मार्गातील अडथळे आपण व्हायचे नाही एव्हढी काळजी घेऊया
अविनाश देशमुख
(सत्यघटनेवर आधारित. तपशील बदलले आहेत. दुर्दैवाने अशा अनेक सत्य घटना समोर यायला लागल्या आहेत.)
कोच अविनाश देशमुख यांच्याशी बोलण्यासाठी 9922446154 / 9657600076 या नंबर वर संपर्क करू शकता
Comments
Post a Comment